Saturday, April 11, 2020

ओम जाधव एक दिव्यशक्ती

SGGSIET Icon
दिव्यशक्ती असलेला: ओम जाधव
         --- डॉ रवींद्र जोशी

     'अरे बघं, तुझी बायको थकलेली दिसतेय! लवकर डोक्यावरचा चारा उतरवं. नऊ महिन्याच पोरगं पोटात असताना कशाला शेतात जावे म्हणते? म्हातारी ओरडली. लगेचच गंगाधरने भारा उतरवला. तशी कांताबाई गवताच्या भाऱ्यावर आडवी झाली. आजीच्या लगेच लक्षात आले आणि तिने शेजारीणला आवाज दिला, 'कुसमे कापड घेऊन ये. कांताच्या पोटात कळा सुरू झाल्यात.' सर्वांनी लुगडं आडवे धरले आणि त्याच गवताच्या पेडींवर अंगणात १९९१ साली ओम गंगाधर जाधवचा जन्म झाला. दहा महिन्यानंतर हे गोंडस बाळ भिंतीचा आधार घेऊन पाऊलं टाकत होतं. त्याच दरम्यान गावात तापीची साथ आली आणि तापीने ओमचे अंग फणफणायला लागले. गावात मेडिकलचा कॅम्प होता तेव्हा तापीत त्याला सिस्टरने इंजेक्शन दिले. पण हळूहळू काही दिवसानंतर त्याचे पावले टाकणे कमी झाले. उठून उभे राहणे बंद झाले, दोन वर्षानंतर तो हाताने सरपटायला लागला. तेव्हा आईवडिलांच्या लक्षात आले की ओम दोन्ही पायांनी अपंग झालायं. रोजंदारीवर पोट भरणाऱ्या शेतमजुराला जेवढं शक्य आहे, तेवढे त्यांनी उपचार केले. शेवटी दारिद्र्या पुढे हात टेकले आणि ओम दोन्ही पायाने कायमचा अपंग झाला.
      गोदावरी नदीच्या काठावर वसलेले पिंपळगाव हे नांदेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गंगाधरला दोन एकर शेती आणि मजुरी यावर आठ जणांचा परिवाराचा गाडा चालायचा. ओमला गावातील शाळेत घातले. बालवाडी ते दुसरीपर्यंत कसेतरी दिवस लोटले. दररोज शाळेत घेऊन जाणे-आणणे हे मजूर कुटुंबाला झेपणारे नव्हते. तेव्हा वडिलांना कुठून तरी माहिती मिळाली की विमानतळाजवळ अपंग विद्यालय आहे. तिथे ओमचे दोन वर्ष शिक्षण झाले आणि ती शाळा बंद पडली. परत दोन वर्षे घरी बसला. गावातले काही लोकं गंगाधरला म्हणायचे, 'पोराचं मागच्या जन्माच काहीतरी पाप असेल, तेव्हा खूळं झालंय. घरात खायला अन्न नाही, कशाला शिकवायची धडपड करतो. राहुदे घराच्या कोपऱ्यात पडून, जगेल कसेतरी.' गंगाधरला माहित होते की मी दहावीच्या पुढे परिस्थितीमुळे शिकलो नाही. मोठा मुलगा, दोन मुली दहावीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. हा शिकला पाहिजे. तेव्हा या शाळेत, त्या शाळेत रोज नेण-आणणं, अशी त्याची धडपड असायची. ओमचे पाय म्हणजे त्याचे वडील होते. परत दोन वर्ष घरी बसला. खबर लागली की सिडकोजवळ नवीन शाळा उघडली आणि तिथे पुढचे शिक्षण सुरू झाले. काही वेळेस दुर्दैव पाठ सोडत नाही. आठवीत असताना संस्थाचालकांचा अपघात झाला आणि ते कोमात गेले, शाळा बंद पडली. तेव्हा लहान दिव्यांग मुलांनी चार महीने गावाकडून धान्य आणून स्वतः स्वयंपाक करून आठवीचे शिक्षण पूर्ण केले.
      शेवटी ओमला गावाजवळील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल वाघीत प्रवेश मिळाला. समाज कल्याणकडून हाताने चालणारी तीन चाकी सायकल ओमला भेटली. तो शरीराने तंदुरुस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शिकायला लागला. रोज चार किलोमीटर हाताने सायकल चालवीत मित्रांच्या मदतीने शाळा व्यवस्थित चालू होती. शिक्षकांची मदत व मार्गदर्शन भेटायला लागले. तशी त्याला अभ्यासात गोडी निर्माण झाली. विज्ञानच्या विलास जोशी सरांचा तो खास विद्यार्थी आणि त्याच्यासाठी संगणक व प्रयोग शाळा नेहमीच उघडी होती. अशाप्रकारे दहावीत ९३%  गुण घेऊन ओम केंद्रात पहिला आला. तोच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता.
      पुढे काय शिकावे? कसे शिकावे? कुठे राहावे? असे अनेक प्रश्‍न ओमला पडायचे. तो विचार करायचा, 'इच्छा तिथे मार्ग, देव तारी त्याला कोण मारी.' शाळेतील सरांचे मार्गदर्शन घेऊन यशवंत महाविद्यालय नांदेड येथे अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. त्याच वर्षी कॉलेजमध्ये ५० जणांची जिनिस बॅच सुरू झाली आणि त्या प्रवेश परीक्षेत टॉप १५ मध्ये ओम आला. नांदेडमध्ये राहण्याचा मोठा प्रश्न होता. तेव्हा पिंपळगाव येथील दूधवाले शंकर मामासोबत काही दिवस येजा केले. त्यानंतर मोंढ्यातील मराठा सेवा केंद्र हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. दरमहा रु. ३००/- मध्ये राहण्याची व खाण्याची सोय झाली. तो हुशार असल्यामुळे मित्रांची ओळख झाली आणि त्यांनी कॉलेजजवळ रूम केली. तेव्हा घरून धान्य आणून हाताने स्वयंपाक, कॉलेजला तीन चाकीने प्रवास अशी ओमची अग्निपरीक्षा चालू होती. बारावीचा निकाल लागला आणि दिव्यांग वर्गातून ९० टक्के गुण घेऊन तो राज्यात पहिला आला. वर्तमानपत्रात, स्टार माझावर ओम जाधव झळकला. 'अपंगत्व, दारिद्र्य, ग्रामीण भाग यशात अडसर नसतात. आपणचं आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो.' असे ओमने मुलाखतीत सांगितले.
       बारावीत पहिला क्रमांक आला, वाहवा झाली, पण पुढे काय? दारिद्र्याचा भस्मासूर आ करून उभा होता. इंजीनियरिंग, रु. ३७०००/- फीस, खर्च कोण करणार? पण ओमच्या दांडग्या इच्छाशक्ती पुढे गरिबीने गुडघे टेकले. सीओईपी पुणे येथे प्रवेश मिळाला असता, पण अनेक प्रश्न होते. तेव्हा गावाजवळील एसजीजीएस इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथे इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. ३७०००/- रुपये फी होती. तेव्हा माजी मंत्री श्री डी. पी. सावंत यांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. अभियांत्रिकीत शिकत असताना मित्र, प्राध्यापक यांची मदत आणि मार्गदर्शन लाभले.
      ओम नेहमी पाहायचा, शरीराने धडधाकट असणारी मुलंमुली तक्रार करायचे. ७०-८०% धडधाकट मानसिकरीत्या कमजोर होती. आई-वडिलांनी हे दिले नाही, ते दिले नाही, त्यामुळे मला मार्क्स कमी पडले. आपल्या अपयशाचे खापर मायबापाच्या नावाने फोडुन मोकळे व्हायचे. तो म्हणायचा, 'अरे भावांनो नुसता विचार करा, तुम्हाला जर एक डोळा, हात, पाय नसता तर काय झाले असते? देवाने तुमच्यावर सर्वस्व लुटलं आहे. शरीराने तंदुरुस्त आहात. आई-वडिलांनी या सुंदर जगात जन्म दिला, हेच आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. तेव्हा भावांनो बहिणींनो स्वतःला ओळखा, सकारात्मकतेने आयुष्याकडे पहा, झपाटून कार्य करा, यश नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहे.' या विचारांमुळे तो अनेक विद्यार्थ्यांचा आयकॉन होता. अनेक वेळेस कोणाची मदत न घेता तो तीन मजले हाताने फरपटत चढायचा. या बिल्डिंगकडून त्या बिल्डिंगमध्ये जायचा. आम्ही अनेक वेळेस त्याच्याकडे आश्चर्याने पाहायचो आणि कौतुकही करायचो. अशी दिव्यशक्ती असलेल्या ओमला गेट परीक्षेत उत्तम क्रमांक येऊन आयआयटी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमटेकला प्रवेश मिळाला. या यशात शिवानंद पाटील हा दहावी ते आयआयटीपर्यंत प्रवासात मोठा वाटेकरी आहे. अनेक ठिकाणी तो त्याच्यासोबत जातो.
       आयआयटीला स्कॉलरशिप असल्यामुळे आर्थिक अडचण भासली नाही, तिथे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळाली आणि तो आता स्वावलंबी झाला होता. तिथे गेल्यामुळे त्याचा दृष्टिकोन प्रगल्भ झाला होता. उच्च शिखराकडे झेप घेण्याच्या तयारीला तो लागला. अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी सुरू केली. आयआयटीतील डॉ. एस. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नेव्ही संबंधित एमटेकचा प्रोजेक्ट पूर्ण केला. सरांचा खूप आधार, मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली. एमटेकच्या अंतिम सत्रात सीडॅकची लेखी व तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या 'मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' यामध्ये टेक्निकल ऑफिसर (ग्रेड A) म्हणून नियुक्ती झाली. हा विभाग संशोधन करणाऱ्या संस्थांना सुपर कम्प्युटरच्या संबंधित सोयी उपलब्ध करून देतो. ओम जाधव २०१७ पासून पुणे येथील हेडक्वार्टरमध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
       एमटेक जेव्हा पूर्ण झाले होते तेव्हा त्याचे आई-वडील दिक्षांत समारंभासाठी विमानाने दिल्लीला आले. ओमचं स्वप्न होतं की आई-वडील राब राब राबले, काबाडकष्ट केले, गरीबीत जगले तेव्हा त्यांच्यासाठी एक सुंदर घर असावं आणि त्याने प्रथम स्वतःसाठी फ्लॅट न घेता पिंपळगाव येथे आईवडिलांसाठी सर्व सुखसोयी संपन्न अशे प्रशस्त घर बांधून दिले. ओमला वयाच्या दुसऱ्या वर्षी अपंगत्वाचा आशीर्वाद मिळाला. पण अपंगत्व त्याच्या यशात कधीही अडथळा बनले नाही. दांडग्या इच्छाशक्तीमुळे अपंगत्वावर मात करून त्याने यशोशिखर गाठले. आयुष्य खरोखरच सुंदर आहे, ओम सारखी सुपरपावर प्रत्येकामध्ये असते. फक्त आव्हान स्वीकारून त्यास सामोरे जायला हवे, तेव्हाच आपण माईलस्टोन गाठू शकतो.