Monday, October 16, 2023

वाचन हे विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य - ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार

वाचन हे विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य - ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार
 उदगीर : प्रत्येक माणसाने वाचत वाचत काहीतरी नवीन वेचत जावे आणि त्यासाठी वाचन हे खाद्य व्हावे. याकरिता अभ्यासक्रमाबाहेरची वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील दिनविशेष समितीच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे, वाणिज्य पर्यवेक्षक प्रा. टी. एन. सगर यांची उपस्थिती होती.
             पुढे बोलताना डॉ. पेन्सलवार म्हणाले, तंत्रज्ञानासह पुस्तक वाचनाकडे विद्यार्थ्यांनी वळणे गरजेचे आहे. भौतिक वस्तू या घराला घरपण देत असतात तर घरातील पुस्तके माणसांना शहाणपण देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तक वाचण्यावरती भर द्यावा, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. मस्के म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची श्रीमंती यायला हवी. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची भूक असते त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची भूक असली पाहिजे. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. त्यामुळे आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री करा, असा आग्रह विद्यार्थ्यांना केला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एन. घोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. के. वळवी यांनी तर आभार प्रा. एम. डी. समगर यांनी केले. यावेळी दिनविशेष समिती प्रमुख डॉ. एस. आर. सोमवंशी, डॉ. सुनंदा भद्रशेट्टे, डॉ. गौरव जेवळीकर यांची विशेष उपस्थिती होती.