*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी*
*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विहिरी, नदी काठावरील बंधाऱ्याचे पंचनामे करण्याचे निर्देश*
उदगीर(श्रीकांत जाधव),दि.26 : उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने मुग , तुर सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाणा , कासराळ ,वाघदरी, टाकळी, धडकनाळ, बोरगाव,बनशेळकी, येणकी, तोगरी, मोघा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची व बनशेळकी येथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. यावेळी श्री. बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती श्री. शिवाजी मुळे, जि. प. सदस्य श्री. कल्याण पाटील, जि. प. सदस्य श्री. ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जि. अध्यक्ष श्री. चंदन पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी सुळे, उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी नाबदे, पोलीस निरीक्षक ग्रामीण वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवटे, यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने आँनलाईन /आँफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनामे बाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे , नदी काठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशाचे सुद्धा पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत करण्यात येईल, आश्वासन राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे ची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment