Saturday, January 30, 2021

उदयगिरी महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन..

उदयगिरी महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन..
उदगीर : ( दिनांक 30 जानेवारी 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून हुतात्मा दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या देशभक्तांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के , डॉ. मल्लेश झुंगास्वामी, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. आर. पी. साबदे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बी. एस. होकरणे, दिनविशेष समितीचे डॉ. गौरव जेवळीकर यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Tuesday, January 26, 2021

*उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

*उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

लातूर/उदगीर, दि.26(जिमाका):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उदगीर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
      यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण  मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भरत राठोड, पोलीस निरीक्षक नारायण उबाळे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना परेड संचलन करण्यास परवानगी दिली. उदगीर तालुक्यातील सैनिकी शाळा, गृहरक्षक दल, पोलिस दल यांनी संचलनात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील व पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड यांचा सत्कार ही राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
       त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार यांची भेट घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता येेेलमेटे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी मानले.
               ********

Sunday, January 24, 2021

ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी...

ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी...
हिंगोली:-राज्यातील  खाजगी व शासकीय माध्यमिक व प्राथमिक  इ.५वी ८वी च्या शाळा २७  जानेवारी पासून सुरू होत आहेत मात्र कोरणा च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांच्या साठी पूर्ववत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली त्यांनी या  निवेदनात म्हटले आहे कोरोना लाॅकडाऊनच्या काळानंतर शाळांना शासकीय नियमाचे पालन करत शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली . आता दि. २७ जानेवारी पासून इ.५वी ८वी या ही शाळा सुरू होत.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरी भागाकडे शाळांसाठी ये-जा करत असतात मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या एस.टी बसेस सुविधा सुरू नाहीत त्यामुळे विद्यार्थी  खाजगी वाहनाने ये-जा करत असतात त्यांचा आर्थिक भुर्दंड या विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहे  तरी शासनाने ही एस.टी बस सुविधा लवकरात लवकर सुरू करावी.

Saturday, January 23, 2021

*1 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय चालू करा अन्यथा विद्यापीठांसमोर 1 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन..**"मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन....*

*1 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय चालू करा अन्यथा विद्यापीठांसमोर 1 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन..*

*"मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन....*
उदगीर:-कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे गेली वर्षभर सर्व शाळा-महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून बंद आहेत सर्व विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू आहे पण ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे ऑनलाईन वर्गात सामील होण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप सारखे साधन उपलब्ध नसल्यामुळे सामील होऊ शकत नाहीत तर जे विद्यार्थी सामील होतात त्या विद्यार्थ्यांचे मोबाईल च्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य संतुलित राहत नाही.
          कोरोना चा प्रभाव कमी होत असल्यामुळे नववी ते बारावी चे रेग्युलर वर्ग चालू करण्यात आले आणि आता शालेय शिक्षण विभागाने देखील 5 वी ते 8 वी चे वर्ग 27 जानेवारी पासून रेग्युलर चालू करण्यासंदर्भात राज्यातील सर्व शाळांना आदेश दिले आहेत.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री या नात्याने आपणही सर्व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय चालू करण्यासंदर्भात 20 जानेवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आश्वासन दिले होते या आश्वासनामुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात महाविद्यालय चालू होतील अशी आशा वाटत होती पण 20 तारीख होऊन दोन दिवस झाले तरी देखील आपण अथवा आपल्या विभागाचा कोणतेही अधिकारी यावर भाष्य केले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आदरणीय साहेबांनी लवकरात लवकर राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी विनंती "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी केली. अन्यथा 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व विद्यापीठासमोर सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा विद्यार्थी नेते तथा "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.

उदयगिरी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी..

उदयगिरी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी..
उदगीर : ( दिनांक 23 जानेवारी 2021) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समितीच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क. म. ), पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे, प्रा. डॉ. बी. एम. संदीकर, ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांची उपस्थिती होती.
               यावेळी बोलताना म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, महापुरुषांचा दृष्टीआड होत चाललेला आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडणे आवश्यक आहे. महापुरुषांना केवळ अभिवादनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक जयंती - पुण्यतिथी ही वैचारिक पर्वणी ठरली पाहिजे, असे  असे मत व्यक्त केले. संस्थेचे सचिव प्रा. पटवारी म्हणाले, चित्रपटातील सिनेअभिनेते हे काल्पनिक असतात त्यामुळे वास्तविकतेचे भान ठेवून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श युवकांनी घ्यावा.11वी व 12 वी ची दोन वर्ष मजा केल्यास आयुष्यभर सजा मिळेल. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या तसेच महापुरुषांना देवत्व न देता देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वारसा युवकांनी पुढे चालवला पाहिजे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार म्हणाले, महापुरुषांच्या जयंत्या साजरा करण्याचा उद्देश त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून प्रेरणा घेण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनी वाचनातून महापुरुषांचे कार्यकर्तृत्व समजून घ्यावे व त्याप्रमाणे आचरण करावे, असा आशावाद व्यक्त केला. डॉ. गौरव जेवळीकर म्हणाले, मार्कवान पिढी निर्माण करण्यापेक्षा चांगला माणूस घडविणे, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासणारा नागरिक निर्माण करणे हा शैक्षणिक संस्थांचा उद्देश असतो. महापुरुषांच्या विचारांचे आचारणात रुपांतर झाल्यास सामाजिक अनाचार कमी होईल, त्यामुळे अशा कार्यक्रमाचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बळीराम भुक्तरे व प्रा. जोतिबा कांदे यांनी तर आभार प्रा. प्रवीण जाहूरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Thursday, January 21, 2021

*माकनी ग्रामपंचायत निवडणुकीतील डॉ.प्रविणकुमार गव्हाणे पॅनलचे प्रमुख डॉ.प्रवीण गव्हाणे साहेबांचा युवकांच्या वतीने सत्कार..*

*माकनी ग्रामपंचायत निवडणुकीतील डॉ.प्रविणकुमार गव्हाणे पॅनलचे प्रमुख डॉ.प्रवीण गव्हाणे साहेबांचा युवकांच्या वतीने सत्कार..*


बाऱ्हाळी:-बाऱ्हाळी सर्कल मधील माकनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डॉ.प्रविणकुमार गव्हाने पॅनल निवडून आल्याबद्दल पॅनल चे प्रमुख डॉ.प्रवीण गव्हाने व डॉ.अनिता गव्हाणे यांचा बाऱ्हाळी येथील आदित्य हॉस्पिटल येथे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भेंडेगाव चे माजी सरपंच हनुमंतराव पाटील,'मास' विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव,प्रवीण पाटील वाकडे,ईश्वर टेम्बुरने आदी उपस्थित होते...

*बाऱ्हाळी ग्रामपंचायत निवडणुकीतील राजनजी देशपांडे (मालक) पॅनलचे प्रमुख मा.राजनजी देशपांडे साहेबांचा युवकांच्या वतीने सत्कार..*

*बाऱ्हाळी ग्रामपंचायत निवडणुकीतील राजनजी देशपांडे (मालक) पॅनलचे प्रमुख मा.राजनजी देशपांडे साहेबांचा युवकांच्या वतीने सत्कार..*


बाऱ्हाळी:-मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी बाऱ्हाळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मा. राजन (मालक) देशपांडे पॅनल निवडून आल्याबद्दल पॅनल चे प्रमुख मा. राजनजी (मालक) देशपांडे साहेब,अंजलीताई देशपांडे मॅडम,व्यंकट पाटील उमाटे साहेब यांचा बाऱ्हाळी येथील राजनजी देशपांडे साहेब यांच्या राहत्या घरी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भेंडेगाव चे माजी सरपंच हनुमंतराव पाटील,प्रवीण इलेक्ट्रिकल चे मालक प्रवीण पाटील वाकडे,'मास' विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव (देशमुख) आदी उपस्थित होते...

*मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार -- रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे*

*मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार -- रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे*

मुंबई दि. 20: महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात वेगवेगळया कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते मात्र आज अनेक कामांसाठी मजूर मिळत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना विभागाच्या माध्यमातून मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी पुढील काळात व्यापक स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

स्वयंसहाय्यता/बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार हमी योजनेमार्फत विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नरेगाचे आयुक्त शंतनू गोयल, रोह्यो विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह यशस्विीनी सामाजिक अभियानाच्या वर्षा निकम, रत्नमाला शिंदे, ज्योती पावरा, मनिषा केंद्रे, उज्ज्वला राऊत उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, आज अनेक ठिकाणी अकुशल मजूर मिळतात पण ते कामावर येण्यास तयार नसातात. येणाऱ्या काळात मजुरांनी जास्तीत जास्ज प्रमाणात सहभाग नोंदवावा यादृष्टीने काम करण्यात येणार आहे. मजूर उपस्थिती वाढविण्यासाठी ग्रामसभा आणि बचत गट यांचाही आधार घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावरील सर्व लोक प्रतिनिधींना रोह्योबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोह्यो मजूरांना मजुरी विहीत कालावधीत मिळेल याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.या योजनेबाबत दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात यावा. रोह्यो कामाची रक्कम मजूरांना लगेच अदा करण्यात यावी. कामाच्या ठिकाणी मजूरांना मिळणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, पाळणाघर या सुविधा मिळतील याबाबत दक्षता घेण्यात यावी असेही श्री. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

*शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल*

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना यशस्वी करण्यासाठी बचत गटातील महिलांनी/प्रतिनिधींनी पुढाकार घेत ही योजना यशस्वी करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबविण्यात येत आहे. शेतीसोबत शेती पूरक व्यवसायाला चालना मिळावी, ग्रामीण आर्थिक चक्राला चालना मिळावी यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार आहे. मनरेगा योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन व शेड बांधणे, कुक्कुटपालन व शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग यांचा समावेश या योजनेत केला असून या योजनेत शेतकऱ्यांना भरीव अनुदान मिळणार आहे.महाराष्ट्रात अनेकवेळा पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या भागात सतत ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते, त्यावेळी ही योजना लाभदायक ठरणार आहे. शेतीपूरक व्यवासायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल आणि शेतीसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत निर्माण होईल असेही श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

*गोथाळा ग्रामपंचायतीवर गजानन कोदळे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व..*

*गोथाळा ग्रामपंचायतीवर गजानन कोदळे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व..*
उदगीर:-अहमदपूर तालुक्यातील सर्वात चर्चेतील असलेली सात सदस्य असलेली गोथाळा ग्रामपंचायतीवर युवा नेतृत्व पॅनल चे पॅनल प्रमुख गजानन कोदळे पाटील यांनी आपल्या पॅनल च्या सात च्या सात जागा निवडून आणून विरोधकांचा धुव्वा उडवत चारिमुंडया चित केले...
               पॅनल प्रमुख यावेळी बोलताना सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करून येणाऱ्या काळात गावासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करण्याचे विश्वास व्यक्त केला व पुढे बोलताना कोदळे पाटील यांनी जे नवं ते गोथाळा गावाला हवं या उक्तीप्रमाणे गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावचा सालगडी म्हणून काम करण्याचे अभिवचन दिले..

Monday, January 11, 2021

*राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार**- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे**परिवहन क्षेत्रातील विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा संपन्न*

*राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार*

*- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे*

*परिवहन क्षेत्रातील विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा संपन्न*

मुंबई, दि. ११ : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्ग सौरउर्जेवर आणणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रीक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. हवेचे प्रदुषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रीक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत सद्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज इलेक्ट्रीक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबनासाठी आणि महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह वाहन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच अशा वेळी त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो, पण आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हे सुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. राज्यात मागील एका वर्षात या आपत्तीग्रस्तांना १३ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात पर्यावरणातील बदलांमुळे येणाऱ्या अशा आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पुढील ५ वर्षात राज्यात इलेक्ट्रीक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. .

पर्यावरण राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ईलेक्ट्रीक वाहनांच्या वापरातून आपण शुन्य प्रदुषणाकडे वाटचाल करणार आहोत. एकुण प्रदुषणातील वाहनांपासून होणारे प्रदुषण हे सर्वाधिक आहे. हे पाहता यापुढील काळात प्रदुषणाचा वाढता स्तर रोखण्यासाठी ईलेक्ट्रीक वाहनांना पर्याय नसेल. मागील काळात आपण मुंबईतील टॅक्सी, रिक्षा, बसेस सीएनजीवर परावर्तीत करु शकलो. यापुढील काळात शुन्य उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रीक वाहनांकडे वळावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीवास्तव म्हणाले की, शहरांमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. एकुण प्रदुषणापैकी २५ टक्के वाटा हा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रीक वाहनांकडे वळाले लागेल. पण हे करताना याबरोबरच आपल्याला हरित उर्जेकडे वळावे सागेल, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, आता इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. देशात सुमारे ८० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. यापुढील काळात इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या वापरास प्राधान्याने चालना देता येईल. तरुणांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांविषयी कुतुहल निर्माण होईल व ते याचा वापर करतील यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. सिंह यांनी मुंबईत मागील काही दिवसात खराब झालेल्या हवेच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त केली. इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढल्याशिवाय महानगरांमधील हवेचे प्रदुषण आपण रोखू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत दिवसभर झालेल्या चर्चेत टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, ओलेक्ट्राचे शरथ चंद्रा, टीव्हीएस मोटार्सचे कमल सूद, उबेरचे महादेवन नंबियार, युलुचे श्रेयांश शहा, ॲम्बिलिफी मोबिलीटीचे चंद्रेश सेठीया, व्हीजन मेकॅट्रॉनिक्सच्या राशी गुप्ता, ऑक्टीलियन पॉवर सिस्टीम्सचे यशोधन गोखले, युमिकोअरचे केदार रेले आदींनी सहभाग घेत इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर माहिती दिली.

०००००

Wednesday, January 6, 2021

उदयगिरीत दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा 'कोरोना योद्धा' म्हणून सत्कार.

उदयगिरीत दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा 'कोरोना योद्धा' म्हणून सत्कार 
उदगीर : (दिनांक 6 जानेवारी 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पाशा पटेल यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सदस्य डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहयोग बँकेचे चेअरमन रमेशअण्णा अंबरखाने, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ( व. म. ), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क.म. ) यांची उपस्थिती होती. यावेळी उदगीर शहरातील 47 पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन कोरोना काळात केलेल्या  कार्याची दखल घेऊन 'कोरोना योद्धा' म्हणून गौरव करण्यात आला.
                प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पाशा पटेल म्हणाले, समाजामध्ये लोकजागृती करण्याची व विधायक कार्यासाठी  लोकमत तयार करण्याची जबाबदारी पत्रकारांनी स्वीकारावी, असे आवाहन केले. यावेळी पर्यावरण व बांबू शेती विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, पत्रकारांनी करून आतील टाळेबंदी च्या काळात समाज उपयोगी केलेले काम हे शब्दातीत आहे देशाच्या विकासात पत्रकारांचे योगदान नाकारता येत नाही पत्रकारितेचे स्वरूप बदलले पण काम व भावना बदललेली नाही बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेला पत्रकार निर्माण व्हावा. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे विकासाशी व माणुसकीशी बांधील आहे. यासाठी आजचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे सांगितले. उदगीरचे पत्रकार संयमी व विकासाभिमुख भुमिका पार पाडत असल्यामुळे यापुढेही उदगीरच्या विकासात पत्रकारांचे योगदान कायम राहील, अशी भावना व्यक्त केली. 
               यावेळी पत्रकारांच्या वतीने सुरेश पाटील नेत्रगावकर, रामभाऊ मोतीपवळे, रसूल पठाण यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयाचे आभार मानले. पत्रकार दिनानिमित्त रमेश अंबरखाने, रामप्रसाद लखोटिया, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर व प्रा. प्रवीण जाहूरे यांनी तर आभार डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Sunday, January 3, 2021

सावित्रीबाई फुलेंचे कार्यकर्तृत्व समाजासाठी दिशादर्शक - रामचंद्र तिरुके. उदयगिरी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

सावित्रीबाई फुलेंचे कार्यकर्तृत्व समाजासाठी दिशादर्शक - रामचंद्र तिरुके.
उदयगिरी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
उदगीर : (दिनांक 3 जानेवारी 2021) सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाचा आदर्श पुढे चालवावा आणि जीवन सार्थकी लागेल, असे कार्य करावे. कारण सावित्रीबाई फुले यांचे कार्यकर्तृत्व संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनविशेष समितीच्यावतीने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ( व. म. ), प्रा. शंकर कोडचे यांची उपस्थिती होती.
               पुढे बोलताना तिरुके म्हणाले, सावित्रीबाई फुले या समाजाचं भूषण आहेत तसेच त्या विचारांचा तेवत राहणारा नंदादीप आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने आज स्त्री शिक्षणाचा जागर होतो आहे. त्यामुळे सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला शिक्षण विचार पुढील पिढ्यांमध्ये रुजवावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचं जन्माच्या मोठेपणापेक्षा कर्तृत्वाचे मोठेपण महत्त्वाचं असतं. त्या अर्थाने सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान स्त्रियांचे मूळ आहेत. सावित्रीबाईंच्या शिक्षण विचारात नितीबोध व मूल्य शिक्षणाचा ठेवा आपल्याला पाहायला मिळतो, असे मत मांडले. याच कार्यक्रमादरम्यान इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. माधवी महाके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच समाजसुधारणेचे मर्म स्त्री शिक्षणात आहे. हा सावित्रीबाईंचा विचार इतिहासाचे दाखले देत स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर आभार प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी होकरणे, डॉ. अशोक नागरगोजे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.