उदयगिरीत दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा 'कोरोना योद्धा' म्हणून सत्कार
उदगीर : (दिनांक 6 जानेवारी 2021) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पाशा पटेल यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सदस्य डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहयोग बँकेचे चेअरमन रमेशअण्णा अंबरखाने, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ( व. म. ), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क.म. ) यांची उपस्थिती होती. यावेळी उदगीर शहरातील 47 पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन 'कोरोना योद्धा' म्हणून गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पाशा पटेल म्हणाले, समाजामध्ये लोकजागृती करण्याची व विधायक कार्यासाठी लोकमत तयार करण्याची जबाबदारी पत्रकारांनी स्वीकारावी, असे आवाहन केले. यावेळी पर्यावरण व बांबू शेती विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, पत्रकारांनी करून आतील टाळेबंदी च्या काळात समाज उपयोगी केलेले काम हे शब्दातीत आहे देशाच्या विकासात पत्रकारांचे योगदान नाकारता येत नाही पत्रकारितेचे स्वरूप बदलले पण काम व भावना बदललेली नाही बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेला पत्रकार निर्माण व्हावा. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे विकासाशी व माणुसकीशी बांधील आहे. यासाठी आजचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे सांगितले. उदगीरचे पत्रकार संयमी व विकासाभिमुख भुमिका पार पाडत असल्यामुळे यापुढेही उदगीरच्या विकासात पत्रकारांचे योगदान कायम राहील, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांच्या वतीने सुरेश पाटील नेत्रगावकर, रामभाऊ मोतीपवळे, रसूल पठाण यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयाचे आभार मानले. पत्रकार दिनानिमित्त रमेश अंबरखाने, रामप्रसाद लखोटिया, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर व प्रा. प्रवीण जाहूरे यांनी तर आभार डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment